इंडिया आघाडीच्या बैठकीला द्रमुक, टीव्हीकेसह या प्रमुख पक्षांची दांडी

Foto
नवी दिल्ली : आज दीर्घकाळानंतर इंडिया आघाडीमधील घटक पक्षांची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांमध्ये केरळचा अपवाद वगळता इतर  ठिकाणी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचा दारुण पराभव झाला होता. तर या निवडणुकीत पश्चिम बंगालसारखे महत्त्वाचे  राज्य जिंकल्याने केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाला आणखी उभारी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या  या बैठकीत सत्ताधारी भाजपाचे विरोधक असलेल्या सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य दिसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आजच्या बैठकीला इंडिया आघाडीतील काही प्रमुख पक्षांनी दांडी मारल्याने इंडिया आघाडीतील बिघाडी कायम आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

आज दिल्लीत काँग्रेसच्या  नेतृत्वात होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. पश्चिम  बंगालमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी या  बैठकीला लावलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. सोबतच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

मात्र तामिळाडूमधील पराभवानंतर काँग्रेसने साथ सोडलेला डीएमके, काँग्रेसने तामिळनाडूत आघाडी केलेला टीव्हीके, अरविंद  केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ  फिरवली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर होत असलेल्या या बैठकीनंतरही इंडिया आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत  आहेत.